छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): गांधेली फाटा परिसरात वकील मिथुन भास्कर यांची चाकूने निघृण हत्या केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या दोन आरोपींना न्यायालयाने शुक्रवार (दि. १७) २३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
अवघ्या २४ तासांत पोलिसांनी या गुन्ह्याची उकल करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
सादीक बशीर अन्सारी (वय ४०, रा. शहानूरमियाँ दर्गा परिसर) आणि नानासिंग हिरासिंग जुली (वय २०, रा. मुकुंदनगर) अशी पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
मृत अॅड. मिथुन हे दहा मिनिटांत जाऊन येतो, असे सांगून घरातून बाहेर पडले होते. त्यानंतर ते रात्री साडेआठच्या सुमारास गांधेली परिसरात गेले. तेथे त्यांची भेट आरोपी सादीकशी झाली. दोघांमध्ये पैशांच्या देवाणघेवाणीवरून वाद झाला. रागातून सादीकने भास्कर यांना एका शेडमध्ये नेऊन त्यांच्या मांडीवर चाकूने वार केले.
या हल्ल्यात अॅड. भास्कर यांचा प्रचंड रक्तस्त्राव झाला. त्यानंतर सादीकने विशिष्ट प्रकारे टाळ्या वाजवून आपला साथीदार नानासिंग जुली आणि एका अल्पवयीन मुलाला घटनास्थळी बोलावले. रक्ताच्या थारोळ्यात असलेल्या भास्कर यांना आरोपींनी रस्त्याच्या कडेला फेकून दिले होते.
आरोपीने धारण केला तृतीयपंथीयाचा वेश
वकिलाची झालेली हत्या दुर्दैवी आहे. तृतीयपंथीयांचा या घटनेशी काहीही संबंध नाही. अटक केलेल्या आरोपीने केवळ तृतीयपंथीयांचा वेश धारण केला होता, प्रत्यक्षात तो तृतीयपंथी नाही. आमचा समाज असे कृत्य कधीही करणार नाही. पोलिस प्रशासनाने तो तृतीयपंथी असेल तर तसे जाहीर करावे. या तपासात आम्ही पोलिसांना सहकार्य करण्यास तयार आहोत, असे सर्व तृतीयपंथी समाजाने कळविले आहे. तसेच पोलिस आयुक्तांना भेटून निवेदन देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.













